HSRP प्लेट नसेल तर गाडीचे काम अडकणार, ₹१०००० चा दंडही बसणार
- Apr 9
- 2 min read
जन चेतना/मुंबई/सचिन बोपचे

तुम्ही जर अजुनही गाडीला 'हाय सिक्युरिटी नंबर प्लेट' (HSRP) लावली नाही. तर आता सावध होण्याची वेळ आली आहे. सरकारने या नियमाची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी १७ एप्रिलची डेडलाइन ठरवण्यात आली आहे. पुढच्या शुक्रवारपासून विना HSRP प्लेटच्या गाड्यांना १०,००० रुपयांपर्यंतचा दंड आकारला जाऊ शकतो. त्याशिवाय एचएसआरपी नंबर प्लेट नसल्यास गाडीशी संबंधित आरटीओची कामे, विम्याचे नूतनीकरण आणि कागदपत्रांची पडताळणी अशा महत्त्वाच्या कामांमध्ये अडथळे येऊ शकतात. त्यामुळे आर्थिक दंड वाचवण्यासाठी आणि शेवटच्या क्षणाची घाई टाळण्यासाठी वेळीच नंबर प्लेट बदलून घ्या.
तुमच्या वाहनाला अद्याप एचएसआरपी नंबर प्लेट (High Security Registration Plate) नसेल, तर तुम्हाला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते. १७ एप्रिलनंतर ज्या वाहनांवर एचएसआरपी नंबर प्लेट नसेल, अशा वाहनांना प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (Pollution Under Control Certificate) दिले जाणार नाही. त्यामुळे एचएसआरपी नंबर प्लेट बसवली नाही, तर गाडीसंदर्भातील महत्त्वाची कामे रखडणार आहेत. पण या नंबरप्लेटसाठी अर्ज कसा कराल. HSRP नंबर प्लेट तुम्ही https://transport.maharashtra.gov.in/ZoneWiseWebsiteRedirect.html यावर ऑनलाइन ऑर्डर करू शकता. तुम्हाला तुमच्या वाहनाचा तपशील भरावा लागेल. तुमच्या वाहनाला एचएसआरपी बसवण्यासाठी तुम्हाला एक तारीख आणि वेळ कळवली जाईल.
हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणजेच एचएसआरपी ही सुरक्षेचा विचार करून तयार केलेली विशेष नंबर प्लेट आहे. त्यामध्ये विशिष्ट कोड आणि होलोग्राम असतात. या नंबरप्लेटमुळे प्रत्येक वाहन सहज ओळखता येते. बनावट नंबर प्लेट्स आणि चोरी यांसारख्या घटना टाळण्यास या नंबर प्लेटमुळे मदत होते. त्यामुळे सरकारकडून एचएसआरपी नंबर प्लेट अनिवार्य केली आहे. आतापर्यंत अनेकांनी ही नंबरप्लेट बसवली आहे. पण काही जणांनी अद्याप नंबर प्लेट बसवली नाही. त्यांना १७ एप्रिलनंतर मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या वाहनाचे पीयूसीसी (PUCC) प्रमाणपत्र नसेल तर मोटार वाहन कायद्यांतर्गत उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या उल्लंघनासाठी एक हजार रूपयांचा दंड आकारला जातो. तर पुन्हा तीच चूक केली तर २ हजारांचा दंड.. त्याशिवाय वारंवार हीच चूक होत असले तर १० हजारांचा दंड आकारला जातो. जर तुमच्या वाहनाला PUCC किंवा HSRP नंबर प्लेट नसेल तर तुम्हाला दोन्हींसाठी स्वतंत्र चलन दिले जाऊ शकते. ज्यामुळे जास्त दंड आकारला जाऊ शकतो. HSRP चलनाचा दंड ₹5,000 पर्यंत असू शकतो.
.





Comments