NMD महाविद्यालयात POSH कायद्याविषयी जनजागृती व संवेदनशीलता कार्यक्रम उत्साहात संपन्न
“No Means No” — संमती, सन्मान आणि वैयक्तिक सीमांचा आदर करण्याचा संदेश
अनंत चेतना/गोंदिया/नितेश आगासे :- NMD College of Arts, Commerce, Law & Management, Gondia येथील अंतर्गत समितीच्या वतीने आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या (IQAC) मार्गदर्शनाखाली शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसाठी “From Bystander to Upstander: Your Role in the Prevention of Sexual Harassment” या विषयावर जनजागृती व संवेदनशीलता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यासोबतच लैंगिक छळ प्रतिबंध या विषयावर पोस्टर स्पर्धाही घेण्यात आली. कार्यक्रमाचा उद्देश POSH Act, 2013 अर्थात कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळापासून संरक्षण कायद्याबाबत जनजागृती करणे आणि सुरक्षित, सन्मानपूर्ण व सर्वसमावेशक शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी विद्यार्थी व कर्मचाऱ्यांची सामूहिक जबाबदारी अधोरेखित करणे हा होता. कार्यक्रमासाठी गोंदिया एज्युकेशन सोसायटीचे संरक्षक प्रफुल्ल पटेल, अध्यक्ष वर्षाताई पटेल, सचिव राजेंद्र जैन आणि निखिल जैन यांनी शुभेच्छा दिल्या.

POSH कायदा आणि सुरक्षित वातावरणाबाबत मार्गदर्शन
कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या श्रीमती निलम अवस्थी-मिश्रा, ICN, नर्सिंग ऑफिसर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर यांनी लैंगिक छळाची विविध कारणे व स्वरूपे याबाबत मार्गदर्शन केले. आपल्या व्यावसायिक अनुभवातील उदाहरणांच्या माध्यमातून लैंगिक शोषण व छळ विविध परिस्थितींमध्ये कशा प्रकारे घडू शकतो, हे त्यांनी स्पष्ट केले.तसेच POSH कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी, तक्रार निवारणाची प्रक्रिया आणि सुरक्षित व सर्वसमावेशक वातावरण निर्माण करण्यात अंतर्गत समितीची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. “No Means No” या संदेशातून त्यांनी संमती, व्यक्तिस्वातंत्र्य, सन्मान आणि वैयक्तिक सीमांचा आदर करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. अनुचित वर्तन किंवा छळाची परिस्थिती उद्भवल्यास योग्य वेळी आवाज उठवून अंतर्गत समिती व उपलब्ध सहाय्य यंत्रणांशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले.
विद्यार्थ्यांचा पोस्टर स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रविंद्र मोहतुरे यांनी अध्यक्षीय भाषणातून कार्यक्रमाचे कौतुक केले. सुरक्षित शैक्षणिक वातावरण निर्माण करणे ही विद्यार्थी, शिक्षक व संपूर्ण शैक्षणिक समुदायाची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. पोस्टर स्पर्धेत विद्यार्थ्यांनी घेतलेल्या सहभागाचेही त्यांनी कौतुक केले. अंतर्गत समितीच्या Presiding Officer डॉ. अश्विनी दलाल यांनी उपस्थितांचे स्वागत करून POSH कायद्यातील तरतुदी, लैंगिक छळाची संकल्पना, तक्रार निवारण प्रक्रिया आणि अंतर्गत समितीची भूमिका याबाबत प्रास्ताविकातून माहिती दिली. कार्यक्रमात महिला सक्षमीकरणावर आधारित दोन लघुपट दाखविण्यात आले. त्यानंतर डॉ. अलका पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली POSH कायद्यावर आधारित संवादात्मक प्रश्नमंजुषा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी त्यात उत्स्फूर्त सहभाग घेतला.
पोस्टर स्पर्धेतील विजेते
लैंगिक छळ प्रतिबंध या विषयावरील पोस्टर स्पर्धेत एकूण 32 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
प्रथम क्रमांक: कु. मोहिनी काटेवार — बी.ए. प्रथम वर्ष
द्वितीय क्रमांक: कु. सुहाना शेख — बी.कॉम. प्रथम वर्ष
तृतीय क्रमांक: कु. ईश्वरी उके — बी.कॉम.
उत्तेजनार्थ पारितोषिक: श्री. सत्यन एन. — बी.कॉम. प्रथम वर्ष
पोस्टरचे परीक्षण श्रीमती निलम अवस्थी-मिश्रा आणि गोंदियातील इंटिरियर डिझायनर व रांगोळी कलाकार श्री. चंचल अग्रवाल यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात गोंदिया एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक स्व. श्री. मनोहरभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, दीपप्रज्वलन व विद्यापीठ गीताने झाली. उपस्थित मान्यवरांचा रोप व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी डॉ. भावेश जेसानी, डॉ. एच. पारधी, डॉ. एस. इंगळे, डॉ. वाय. बैस, डॉ. यू. उदापूरे, डॉ. एस. जाधव, डॉ. तृप्ती जेसानी, डॉ. के. होटचंदानी, प्रा. एस. जगणे, प्रा. गणेश आणि श्री. मुन्ना राणा यांनी सहकार्य केले. मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झालेल्या या कार्यक्रमाचा समारोप जागरूकता, कायदेविषयक साक्षरता, संवेदनशीलता आणि सामूहिक जबाबदारीच्या माध्यमातून सुरक्षित व सन्मानपूर्ण शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याच्या निर्धाराने करण्यात आला.





Comments