top of page

असंघटीत कामगारांसाठी प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना नोंदणी करण्याचे आवाहन

  • Mar 22
  • 1 min read

जनचेतना/गोंदिया/सचिन बोपचे


सर्व असंघटीत कामगारांनी प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेअंतर्गत नोंदणी करण्याचे आवाहन,सहायक कामगार आयुक्त, गोंदिया मार्फत करण्यात आले आहे.यासाठी जिल्ह्यातील सर्व असंघटित पुरुष किंवा स्त्री कामगार नोंदणी करु शकतात. नोंदणीसाठी पात्रता : वय 18 ते 40 वयोगट. मासिक उत्पन्न 15 हजार रुपये पेक्षा कमी. आयकर भरणारा नसावा. EPFO व ESIC अथवा राष्ट्रीय पेंशन योजनेचा सदस्य नसावा. नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे : आधारकार्ड, आधारकार्डशी लिंक असलेले मोबाईल नंबर, राष्ट्रीयकृत बँक पासबुक.

 

नोंदणीचे लाभ : जर कोणत्याही असंघटित कामगाराने या योजनेचे सदस्यत्व घेतले असेल आणि त्याने वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत नियमित योगदान दिले असेल, तर त्याला किमान मासिक 3 हजार रुपये पेंशन मिळेल. त्याच्या/तिच्या मृत्यूनंतर पती/पत्नीला मासिक कुटुंब पेंशन मिळेल जे पेंशनच्या 50 % राहील. लाभार्थी कामगारांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या वैवाहीक जोडीदारास योजना सुरु ठेवता येणार. लाभार्थीस स्वेच्छेने योजनेतून बाहेर पडावयाचे झाल्यास जमा केलेल्या अंशदानासह व्याजाची रक्कम परत मिळणार.

 

नोंदणीची कार्यपध्दती : जिल्ह्यातील नागरी सुविधा केंद्र (CSC) मार्फत नोंदणी करण्यात येईल. 18 ते 40 वयोगटातील लाभार्थ्यांना 55 ते 200 रुपये पर्यंत प्रतिमाह अंशदान भरावे लागेल. लाभार्थी आधारकार्ड, बँक पासबुक व मोबाईल क्रमांकासह नागरी सुविधा केंद्रास भेट देईल. लाभार्थीच्या वयानुसार मासिक अंशदानाच्या रक्कमेची गणना सिस्टीमद्वारे ऑनलाईन करण्यात येईल. लाभार्थ्यांना पहिल्या महिन्याची अंशदानाची रक्कम नागरी सुविधा केंद्रात रोखीने भरावे लागेल. अंशदानाची रक्कम अदा केल्यानंतरही लिंकद्वारे पेंशन खाता क्रमांक जारी करण्यात येईल.

 

नोंदणीसाठी आपल्या नजीकच्या नागरी सुविधा केंद्राला (CSC) भेट द्यावी. तुमच्या हक्काचे संरक्षण आणि उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेकरीता नोंदणी करावी, असे आवाहन सहायक कामगार आयुक्त राजदिप धुर्वे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी सहायक कामगार आयुक्त कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, तिसरा माळा, खोली क्र.35, जयस्तंभ चौक, गोंदिया येथे संपर्क साधावा.


Comments


bottom of page