top of page

आमदार डॉ. परिणय फुके शेतकऱ्यांच्या शेतात

Sep 22
1 min read

दुष्काळासंदर्भात केली पाहणी - सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही


अनंत चेतना/गोंदिया : दुष्काळाचे संकट गडद होत असून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू झाले आहे. याचाच एक भाग म्हणून आमदार डॉ. परिणय फुके यांनी देवरी भागातील गावांमधील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली. प्रत्यक्ष पिकाच्या नुकसानीचा आढावा घेत त्यांनी शेतकऱ्यांसोबत चर्चा करीत दिलासा दिला.



राज्यात दुष्काळाचे संकट असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर सत्ताधारी आमदार शेतकऱ्यांच्या बांध्यावर जाऊन पाहणी करीत आहे. गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील भागी गावात आमदार डॉ. परिणय फुके यांनी तहसिलदार, तलाठी यांना सोबत घेऊन शेतीची पाहणी केली. पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे येथील धान शेती धोक्यात आली आहे. भात शेतीला मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवश्यकता असते, मात्र पावसाने दडी मारल्याने सुमारे धान पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. आमदार डॉ. फुके यांनी या शेतीची पाहणी केली. त्यांच्या समवेत तहसीलदार रोहित शैलखंडे, मंडळ अधिकारी प्रकाश वैद्य, तलाठी उज्वल पटले, वीरेंद्र अंजनकर, राजू शाहू, प्रवीण दहीकर, इंद्रजीत भाटिया उपस्थित होते. यावेळी शेतीची स्थिती बघता आमदार डॉ. फुके यांनी शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून दखल घेण्यात येत असून दिलासा देण्यात येईल, अशी ग्वाही दिली. राज्य सरकारकडून सध्या सर्वेक्षण आदी प्रक्रिया केली जात असून पूर्ण करून मदत जाहीर केली जाईल, असेही त्यांनी शेतकऱ्यांंना आश्वस्त केले. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तत्काळ प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना दिल्या. तालुक्यातील लघु प्रकल्पातील पाण्याचीही आमदार डॉ. फुके यांनी माहिती घेतली. पाणीटंचाईची शक्यता बघता त्यांनी अधिकाऱ्यांना उपाययोजना करण्याच्याही सूचना केल्या.



 
 
 

Comments


bottom of page