गोंदिया–बालाघाट रेल्वे मार्गावरील विलंबामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
दररोज २ ते ३ तास उशीर; रेल्वे प्रशासनाने तातडीने वेळापत्रक सुरळीत करण्याची मागणी
अनंत चेतना/गोंदिया/विवेक हरिनखेड़े : गोंदिया–बालाघाट रेल्वे मार्गावर धावणाऱ्या रेल्वे गाड्या गेल्या काही दिवसांपासून दररोज तब्बल २ ते ३ तास उशिराने धावत असल्याने शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रेल्वेच्या विलंबामुळे विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालयात वेळेवर पोहोचता येत नसून त्यांच्या शैक्षणिक वेळापत्रकावर त्याचा परिणाम होत आहे. गोंदिया–बालाघाट मार्गावरून दररोज मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षणासाठी प्रवास करतात. अनेक विद्यार्थी रेल्वे सेवेवरच अवलंबून आहेत. मात्र, गाड्या वेळेवर न आल्याने विद्यार्थ्यांचे तासिका, परीक्षा तसेच विविध शैक्षणिक उपक्रमांमध्ये नुकसान होत असल्याचे पालक व विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. रेल्वे गाडीच्या प्रतीक्षेत विद्यार्थ्यांना रेल्वे स्थानकावर बराच वेळ थांबावे लागते. त्यानंतर गाडी उशिराने पोहोचल्याने शाळेत जाण्यास विलंब होतो. परिणामी विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि अभ्यासावरही परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

या समस्येची गांभीर्याने दखल घेत गोंदिया–बालाघाट रेल्वे मार्गावरील गाड्यांचे वेळापत्रक नियमित करून रेल्वे सेवा वेळेवर सुरू ठेवावी, अशी मागणी विद्यार्थी व पालकांकडून करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने या प्रश्नावर तातडीने उपाययोजना करावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित हा प्रश्न असल्याने रेल्वे प्रशासनाने विलंबाचे कारण स्पष्ट करून सेवा सुरळीत करण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे.





Comments