तिरोड्यात पोलिसांचा नशामुक्तीचा नारा; विद्यार्थ्यांच्या पथनाट्याने जिंकली नागरिकांची मने
अनंत चेतना/तिरोडा :- तरुण पिढी नशेच्या विळख्यात अडकू नये आणि समाज नशामुक्त व्हावा यासाठी तिरोडा पोलिसांनी आता कंबर कसली आहे. पोलीस स्टेशन तिरोडा तर्फे आज शहरात अमली पदार्थ विरोधी जबरदस्त जनजागृती मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेचे मुख्य आकर्षण ठरले ते मेरिटोरियस पब्लिक स्कूलच्या चिमुकल्यांचे पथनाट्य. शहराच्या मध्यवर्ती बस स्टँड आणि भाविकांची गर्दी असलेल्या तिरोड्याचा राजा गणेश मंडळ, गंज मार्केट येथे विद्यार्थ्यांनी 'नशा छोड़ो, जीवन जोड़ो' चा संदेश देणारे डोळ्यात अंजन घालणारे पथनाट्य सादर केले. अमली पदार्थांमुळे एक सुखी कुटुंब कसे उद्ध्वस्त होते, याचे हृदयद्रावक चित्रण विद्यार्थ्यांनी आपल्या अभिनयातून मांडले. उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

डॉग स्क्वॉडसह पानटपऱ्यांवर छापे
फक्त जनजागृतीच नव्हे तर कारवाईचा बडगाही पोलिसांनी उगारला आहे. दिनांक 22/09/2026 रोजी पोलीस डॉगच्या मदतीने शहरातील संशयितांच्या घरांवर व पानटपऱ्यांवर अचानक शोध मोहीम राबवून अमली पदार्थांचा शोध घेण्यात आला. ही संपूर्ण धडक कारवाई API कवाडे यांच्या नेतृत्वात HC निलपत्रेवार, HC चवले, PC अमित गायकवाड, PC पेशाने, PC घुगे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.
नशामुक्त तिरोडा हेच ध्येय - तिरोडा पोलीस
तिरोडा शहराला अमली पदार्थ मुक्त करण्यासाठी अशा मोहिमा सातत्याने सुरू राहतील, असा कडक इशारा तिरोडा पोलिसांनी दिला आहे.





Comments