top of page

तिरोड्यासोबत गोंदिया जिल्ह्यातील इतर तालुक्यांनाही दुष्काळी मदत द्या - भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष छत्रपाल तुरकर यांची मागणी

Sep 29
1 min read

पिकांवरील रोगराई, महागडी औषधे व घटत्या उत्पादनामुळे शेतकरी आर्थिक संकटात


जनचेतना/गोंदिया : राज्यातील अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शासनाने राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. या यादीत गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, जिल्ह्यातील इतर तालुके दुष्काळी यादीत नसल्याने त्या भागातील शेतकऱ्यांनाही तातडीने मदत मिळावी, अशी मागणी भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष छत्रपाल तुरकर यांनी केली आहे. यंदाच्या खरीप हंगामात गोंदिया तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पिकांवर विविध प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. रोगराईपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना वारंवार महागडी औषधे व कीटकनाशकांची फवारणी करावी लागत आहे. त्यामुळे उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला असून, दुसरीकडे पिकांचे उत्पादनही अपेक्षेप्रमाणे होण्याची शक्यता कमी आहे.



एकीकडे वाढता उत्पादन खर्च आणि दुसरीकडे घटणारे उत्पादन, या दुहेरी संकटामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे केवळ दुष्काळी यादीतील तालुक्यांपुरती मदत मर्यादित न ठेवता, प्रत्यक्ष शेतातील परिस्थितीचा सर्वेक्षण करून गोंदिया जिल्ह्यातील इतर तालुक्यांनाही मदतीच्या कक्षेत आणावे, अशी मागणी तुरकर यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळी यादीत समावेश न झालेल्या तालुक्यांची पीक व पाण्याची परिस्थिती तपासून आवश्यकतेनुसार मदत देण्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील इतर तालुक्यांचाही तातडीने आढावा घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष नुकसानीचा पंचनामा करून तातडीने आर्थिक मदत, पीक नुकसान भरपाई आणि आवश्यक कृषी निविष्ठांसाठी मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष छत्रपाल तुरकर यांनी केली आहे.



 
 
 

Comments


bottom of page