दुष्काळाच्या यादीतून गोंदिया तालुका वगळला; शेतकऱ्यांमध्ये संताप
जनचेतना/गोंदिया/विवेक हरिनखेड़े : महाराष्ट्र सरकारने नुकतीच दुष्काळग्रस्त तालुक्यांची घोषणा केली असून, नागपूर विभागात गोंदिया जिल्ह्यातील केवळ तिरोडा तालुक्याचा दुष्काळग्रस्त म्हणून समावेश करण्यात आला आहे. मात्र, गोंदिया तालुक्यातही सततच्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, तालुक्याला दुष्काळग्रस्त घोषित न केल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. यंदा सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे महागडी कीटकनाशके आणि औषधांची फवारणी करावी लागत असून, उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यातच पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या घोषणेत गोंदिया तालुक्याचा समावेश न झाल्याने शेतकऱ्यांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. शासनाने प्रत्यक्ष नुकसानीचा आढावा घेऊन गोंदिया तालुक्याचाही दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा, अशी मागणी जोर धरत आहे.

धान उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी कायम
धान उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये यंदा आणखी भर पडली आहे. बोनसची रक्कम न मिळणे, धानाला योग्य भाव न मिळणे आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे शेती आर्थिकदृष्ट्या तोट्याची ठरत असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. धान विक्री केल्यानंतरही अनेकदा शेतकऱ्यांना तातडीने पैसे मिळत नसल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच अनेक शेतकरी अद्याप कर्जमाफीपासून वंचित असल्याचेही सांगितले जात आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कृषी मालाला योग्य भाव मिळावा, कर्जमाफीचा लाभ सर्व पात्र शेतकऱ्यांना मिळावा आणि नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे. शासनाने गोंदिया तालुक्यातील शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून तातडीने योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





Comments