top of page

पेपरफुटीनंतर नागपूरचा डमी उमेदवार गोंदियात परीक्षा देताना पकडला

  • Mar 23
  • 2 min read

जनचेतना/गोंदिया/सचिन बोपच




नागपूर: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत दोन पेपर आधीच व्हॉट्सॲपवर व्हायरल झाल्याच्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असताना आता दहावीच्या परीक्षेत डमी उमेदवार परीक्षा देत असल्याचे समोर आले आहे. अनेक शिक्षण संस्था विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्तीर्ण करून देण्यासाठी अशाप्रकारचे प्रयोग करत असल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षा पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या पहिल्या दिवशी गोंदिया जिल्ह्यात मराठीच्या पेपरसाठी आढळलेला ‘डमी’ विद्यार्थी उत्तर नागपूरचा रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या नावे त्याने परीक्षा दिली तोही नागपुरातीलच विद्यार्थी आहे.

 

शुक्रवारी दहावीचा मराठी विषयाच्या पेपरदरम्यान गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील गिरिजाबाई कन्या हायस्कूल केंद्रावर पर्यवेक्षकाला एका विद्यार्थ्यांच्या जागी दुसराच बसल्याची बाब निदर्शनास आली होती. या विद्यार्थ्याच्या ओळखपत्राची तपासणी केली असता त्यावरील फोटो चिटकविला असल्याचे दिसले. ही बाब लक्षात आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली.

 

यात त्याने आपण नागपुरातील पंचशीलनगरात वास्तव्यास असल्याची कबुली दिली. गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील अनेक केंद्रावर कॉपी होत असल्याची तक्रार सातत्याने होते. त्यातच ‘डमी’ उमेदवार सापडल्याने शिक्षण संस्थांद्वारे आर्थिक फायद्यासाठी अशाप्रकारे बाहेरच्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात असल्याचे निदर्शनास येते. यामागे मोठे ‘रॅकेट’ची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

विभागात कॉपीच्या एकाही प्रकरणाची नोंद झाली नसली तरी ग्रामीण भागातील शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचे दिसून आले. मात्र, अनेक शाळांमध्ये भरारी पथके पोहचली नसल्याची माहिती आहे. परीक्षा सुरळीत आणि पारदर्शक वातावरणात पार पडावी यासाठी शिक्षण मंडळाने विशेष उपाययोजना केल्या होत्या. याशिवाय महसुली विभागाची भरारी पथकेही नेमण्यात आली होती.

गैरप्रकार रोखण्यासाठी आणि परीक्षेची पवित्रता जपण्यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. हे पथक परीक्षा केंद्रांवर अचानक भेटी देऊन गैरप्रकार आढळल्यास त्वरित कारवाई करणार होती. परंतु, हिंगणा तालुक्यातील अनेक शाळांमध्ये गैरप्रकार झाल्याची माहिती आहे. येथील अनेक शाळांमध्ये भरारी पथकेच पोहचली नाही. त्यामुळे विभागीय शिक्षण मंडळाने कॉपीची प्रकरणे नोंदवली नसली तरी ग्रामीण भागात गैरप्रकार रोखण्यात विभागाला अपयश आले आहे.


Comments


bottom of page