top of page

मोठी बातमी..! ‘या’ 3 जिल्ह्यात शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

  • 6 days ago
  • 1 min read

जनचेतना/मुंबई/सचिन बोपचे :- राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतील शाळा-महाविद्यालयांना सोमवार, ६ जुलै २०२६ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.


ठाणे जिल्ह्यात शाळा बंद

भारतीय हवामान विभागाने ठाणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी ६ जुलै रोजी सर्व अंगणवाडी, बालवाडी तसेच शासकीय व निमशासकीय प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.


KDMC हद्दीतील शाळांनाही सुट्टी

अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) प्रशासनानेही महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महापालिका हद्दीतील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पालकांनी विद्यार्थ्यांना घराबाहेर न पाठवण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

रायगड आणि पालघरमध्येही शाळा-महाविद्यालये बंद

रायगड आणि पालघर जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि हवामान विभागाच्या अतिमुसळधार पावसाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी ६ जुलै रोजी सर्व शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला असून नागरिकांनीही अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.


प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

पावसाचा जोर पुढील काही तास कायम राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी नदी-नाले, समुद्रकिनारे आणि पाणी साचलेल्या भागांपासून दूर राहावे, अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 
 
 

Comments


bottom of page