top of page

महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यास प्रयत्नशील - जि.प.अध्यक्ष लायकराम भेंडारकर

  • Mar 22
  • 2 min read

पलाश प्रदर्शनीचे थाटात उद्घाटन

जनचेतना/गोंदिया/सचिन बोपच



महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरु आहेत.  येत्या काळात जिल्ह्यातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यास आपण प्रयत्नशील आहोत, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी आज येथे केले.

          ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) च्या वतीने दि.17 ते 21 फेब्रवारी 2026 दरम्यान इंदिरा गांधी स्टेडियम गोंदिया येथे ‘पलाश’ मिनी सरस भव्य प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रदर्शनीचे आज उद्घाटन करण्यात आले, यावेळी श्री. भेंडारकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.

          यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुरेश हर्षे, अर्थ व बांधकाम सभापती डॉ.लक्ष्मण भगत, कृषि व पशुसंवर्धन सभापती दिपा चंद्रिकापुरे, पंचायत समिती सभापती मुनेश रहांगडाले, मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.तानाजी लोखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) फनेंद्र कुतीरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) मधुकर वासनिक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) विजय लोंढे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रमिला जाखलेकर व इतर पदाधिकारी मंचावर उपस्थित होते.

         श्री. भेंडारकर म्हणाले, ‘पलाश’ मिनी सरस प्रदर्शन हे केवळ वस्तुंचे प्रदर्शन नसून ग्रामीण भागातील महिलांच्या कला व कौशल्यातून तयार करण्यात आलेल्या वस्तुंचे प्रदर्शन आहे. यामध्ये खाद्यपदार्थ, मसाले, ग्रामीण कलाकुसर व अनेक दर्जेदार उत्पादने आहेत. महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी आपण जिल्हा परिषदेमार्फत निश्चितच प्रयत्न करु, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

         जिल्ह्यातील महिला बचतगटांनी गुणवत्तापूर्ण वस्तु तयार करावेत. उत्पादित वस्तुंची मार्केटींग करण्याकरीता ग्राहकांनी वस्तु विकत घेण्यासाठी पॅकेजींगवर विशेष भर देण्यात यावे. या पलाश प्रदर्शनीत असलेल्या ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेल्या वस्तु नागरिकांनी अवश्य घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम त्यांनी यावेळी केले.

         पलाश मिनी सरसमध्ये ग्रामीण भागातील 125 स्वयं सहायता समूह सहभागी झालेले आहेत. गोंदिया जिल्ह्यात सध्या 18 हजार स्वयं सहाय्यता समूह (SHG), 850 ग्रामसंघ व 52 प्रभागसंघ कार्यरत आहेत. या सर्व संस्थांच्या माध्यमातून अंदाजे 2 लाखांहून अधिक महिला उमेद अभियानाशी जोडलेल्या आहेत. या महिला विविध प्रकारच्या शेतीआधारित, पशुपालन, मत्स्यपालन, वनउत्पादन आधारित व बिगर शेती (Non-Farm) उपक्रमांमध्ये कार्यरत असून त्यांनी अनेक दर्जेदार उत्पादने विकसित केली आहेत, असे प्रास्ताविकातून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रमिला जाखलेकर यांनी सांगितले.

        सदर ‘पलाश’ प्रदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम गोंदिया येथे दिनांक 17 ते 21 फेब्रवारी 2026 पर्यंत सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरु राहणार असून आपण या प्रदर्शनीला अवश्य भेट देवून वस्तु विकत घ्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

        कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विस्तार अधिकारी वैशाली खोब्रागडे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार जिल्हा अभियान व्यवस्थापक नरेंद्र रहांगडाले यांनी मानले. कार्यक्रमास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.राज्य संस्था आणि सर्वसमावेशक ग्रामीण विकास साध्य करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.


Comments


bottom of page