top of page

विविध घटनेत चौघांचा मृत्यू…..सासरच्या जाचाला कंटाळून महिलेने संपवले आयुष्य

  • Mar 23
  • 2 min read

जनचेतना/गोंदिया/सचिन बोपच



गोंदिया: सालेकसा तालुक्यात पती सोबत झालेल्या वादामुळे माहेरी आलेल्या ३८ वर्षीय विवाहितेने तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सालेकसा तालुक्यातील पानगाव येथे उघडकीस आली आहे. मीरा माखनलाल दशहरे असे मृत महिलेचे नाव असून ती मध्यप्रदेशातील चिखली (ता. लांजी, जि. बालाघाट) येथील रहिवासी होती.

१८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता मीरा तिचे पती माखनलाल दशहरे आणि मुलगा रोहित यांच्यासोबत माहेरी पानगाव येथे आली होती. पती आणि मुलाने तिला माहेरी सोडले आणि ते आपल्या गावी परतले. मात्र त्याच दिवशी सायंकाळी ४ वाजेपासून मीरा वडिलांच्या घरून कोणालाही न सांगता बेपत्ता झाली. नातेवाइकांनी तिचा दोन दिवस सर्वत्र शोध घेतला. परंतु ती कोठेही मिळाली नाही. अखेर तिचे वडील रमेश पगरवार यांनी १९ फेब्रुवारी रोजी सालेकसा पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता पानगाव येथील तलावात एक मृतदेह तरंगताना नागरिकांना दिसला. ग्रामस्थांनी आरडाओरड केल्यावर वडील रमेश पगरवार आणि कुटुंबातील सदस्यांनी तलावाकडे धाव घेतली. तलावाच्या काठापासून ४ फूट अंतरावर असलेला तो मृतदेह मीराचा असल्याचे कुटुंबीयांनी ओळखले.

 

घटनेची माहिती मिळताच माजी सरपंच चेतलाल हटिले यांनी पोलिसांना पाचारण केले. मीराचे वडील रमेश पगरवार यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मीरा आणि तिच्या पतीमध्ये काही कारणास्तव वाद झाला होता. त्या वादातूनच तिने माहेरी सोडण्याचा हट्ट धरला होता. माहेरी आल्यावर मानसिक तणावातून तिने १८ तारखेच्या रात्री तलावात उडी मारून आत्महत्या केली असावी, असा अंदाज वडिलांनी व्यक्त केला आहे.

 

सालेकसा पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी सालेकसा पोलीस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला. ठाणेदार भूषण बुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक तपास करीत आहेत.

एकाचा मृत्यू गोंदिया ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या ढीमरटोली बस स्थानकाजवळ बोलेरो पिकप ने पॅशन प्रो या दुचाकी गाडी ला मागून धडक दिली असल्याने घडलेल्या अपघातात एकाच्या मृत्यू झाल्याची घटना रविवार २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ५:३० वाजताच्या सुमारास घडली. जितेंद्र तेजलाल ठाकरे (२९) राहणार गिधाडी तालुका गोरेगाव असे या घटनेतील मृतकाचेनाव आहे.गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी पहाटेच्या सुमारास गोरेगाव कडून गोंदिया कडे येणाऱ्या बोलेरो पिकप गाडीने समोर चालत असलेल्या दुचाकी ला मागून धडक दिली असता दुचाकी चालक जितेंद्र तेजलाल ठाकरे याच्या घटनास्थळीत मृत्यू झाला तर दुचाकी वर मागे बसलेला निलेश पटले हा गंभीर जखमी असून त्याच्यावर गोंदिया येथील केटीएस शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. गोंदिया ग्रामीण पोलिसांनी बोलेरो पिकप चालक जमील खान याला अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सिंघणजुडे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

 

गोंदिया तालुक्यातील रावणवाडी पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सावरी गावात एका ४० वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी रावणवाडी पोलिस स्टेशन येथे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भुमेश नीलकंठ बघेल (४०, रा. सावरी, ता. जि. गोंदिया) यांनी शनिवार २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास राहत्या घरासमोरील खोलीतील पंख्याला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतला. ही बाब निदर्शनास येताच नातेवाइकांनी पोलिसांना माहिती दिली. रावणवाडी पोलिसांनी या घटनेसंदर्भात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

 

अपघातात जखमी तरूणाचा मृत्यू

गोंदिया तालुक्यातील ओझीटोला ते लोधीटोला मार्गावर झालेल्या भीषण अपघातात जखमी झालेल्या तरुणाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना रविवारी २२ फेब्रुवारी रोजी घडली. याप्रकरणी गोंदिया शहर पोलिस स्टेशन येथे आकस्मीक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. इंदलचंद चितामण बिसेन (३१) रा. जमुनिया, पो. काचेवानी, ता. तिरोडा, जि. गोंदिया यांचा २० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास ओझीटोला-लोधीटोला रस्त्यावर अपघात झाला होता. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथील एम्स हॉस्पिटल, मिहान येथे दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेसंदर्भात गोंदिया शहर पोलिसांनी आकस्मीक मृत्यूची नोंद केली आहे.


Comments


bottom of page