top of page

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, राज्य सरकार पाठीशी खंबीरपणे उभे : उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

Sep 26
2 min read

पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला असून, उभ्या पिकांचे नुकसान होत असताना त्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. संकटाच्या काळात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही. झालेल्या नुकसानाची योग्य ती दखल घेऊन, सर्वतोपरी मदत देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिली. बीड जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि टंचाईची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी त्यांनी दौऱ्यादरम्यान माजलगाव व गेवराई तालुक्यातील विविध गावांना भेट दिली. यावेळी त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली आणि ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. मदत व पुनर्वसन विभागामार्फत  २५ सप्टेंबर  रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून, याद्वारे राज्यातील खरीप हंगामातील Trigger-१ (प्रथम कळ) लागू झालेल्या एकूण २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये बीड जिल्ह्यातील सर्व ११ तालुके (बीड, गेवराई, माजलगाव, केज, आंबेजोगाई, परळी, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, धारूर आणि वडवणी) दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले आहेत.



या शासन निर्णयानुसार दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी शासनाकडून खालीलप्रमाणे विविध विशेष उपाययोजना व सवलती लागू करण्यात आल्या आहेत:

* जमीन महसूलात सूट देण्यात आली आहे.

* पिक कर्जाचे पुनर्गठन केले जाणार आहे.

* शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्यात आली आहे.

* कृषी पंपांच्या चालू वीज बिलात सूट लागू करण्यात आली आहे (७.५ हॉर्सपावर पर्यंतचे वीज बिल अगोदरच माफ असल्यामुळे त्यावरील पंपांना ही सवलत लागू राहील).

* शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी देण्यात आली आहे.

* रोहयो अंतर्गत कामांच्या निकषात शिथिलता आणून जास्तीत जास्त कामे सुरू करण्याचे निर्देश आहेत.

* आवश्यक त्या ठिकाणी पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकर्सचा वापर केला जाणार आहे.

* टंचाई जाहीर केलेल्या गावांमधील शेतकऱ्यांच्या शेतीपंपांची वीज जोडणी खंडित न करण्याचे आदेश आहेत.

* शेतीवर आश्रित शेतकरी व मजुरांना अन्नधान्याची टंचाई भासणार नाही याची व्यवस्था उभी केली जात आहे.

* जनावरांसाठी आवश्यक चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यात आली आहे.

* जलसंधारणाची कामे युद्धपातळीवर सुरू करण्यात येत आहेत.

* पिण्याच्या पाण्याचे आणि जनावरांच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


दौरादरम्यान पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी माजलगाव तालुक्यातील माली पारगाव, वारोळा, धर्मेवाडी तसेच गेवराई तालुक्यातील सिरसदेवी या गावांना भेट दिली. माजलगाव तालुक्यातील माली पारगाव येथील शेतकरी पद्माकर शिंदे यांच्या शेतात जाऊन त्यांनी अतिवृष्टी व दुष्काळामुळे उद्ध्वस्त झालेल्या सोयाबीन पिकाची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच धर्मेवाडी गावातील शिवार व पिकांच्या परिस्थितीची पाहणी करून शेतकरी बांधवांशी सविस्तर संवाद साधला. याशिवाय, गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथील शेतकरी सचिन आणि राव यांच्या शेतावर जाऊनही त्यांनी तेथील पिकांच्या परिस्थितीची पाहणी केली. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना पाहून, त्यांनी शासन स्तरावरून सर्वतोपरी मदत मिळवून देण्याचे ठोस आश्वासन दिले. “शेतकऱ्यांनी खचून न जाता हिंमत ठेवावी, हे सरकार पूर्णपणे आपल्यासोबत आहे,” असे सांगत त्यांनी उपस्थितांना दिलासा दिला. या पाहणी दौऱ्यात प्रशासकीय यंत्रणेसह प्रमुख राजकीय मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार प्रकाश सोळुंके, आमदार विजयसिंह पंडित, आमदार विक्रम काळे, आमदार राजेश विटेकर, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, माजी आमदार अमरसिंह पंडित, एडवोकेट राजेश्वर चव्हाण, रमेश आडसकर, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन रहमान, जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी साळवे, पशुसंवर्धन उपसंचालक श्री. कदम यांच्यासह तहसीलदार श्री. रुईकर, तालुका कृषी अधिकारी श्री. बादाडे, मंडळ कृषी अधिकारी श्री. खेडकर आणि माली पारगावच्या सहायक कृषी अधिकारी ऋतुजा पेंदाम यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



 
 
 

Comments


bottom of page