सुभेदार नेतराम कटरे शिमला येथे कर्तव्य बजावताना शहीद
- Mar 22
- 1 min read
जनचेतना/गोंदिया/सचिन बोपच
महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण; हिमाचलमध्ये दरड कोसळून सुभेदार नेतराम हेमराज शहीद

हिमाचल प्रदेशातील दुर्गम भागात कर्तव्यावर असताना दरड कोसळून झालेल्या भीषण अपघातात महाराष्ट्राच्या गोंदिया जिल्ह्यातील सुपुत्र सुभेदार नेतराम हेमराज यांना वीरमरण आले. ही दुर्दैवी घटना १९ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास हिमाचलमधील सुमडो परिसरात घडली. या घटनेमुळे संपूर्ण गोंदिया जिल्ह्यासह राज्यावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, सुभेदार नेतराम हेमराज हे भारतीय लष्कराच्या ८६३ इंजिनिअर वर्क्स सेक्शनमध्ये (EWS) कनिष्ठ अभियंता (JE-Civ) म्हणून कार्यरत होते. १९ फेब्रुवारी रोजी ते आपल्या युनिटच्या कामाच्या देखरेखीसाठी झाकरी येथून सुमडोच्या दिशेने जात होते. दुपारी १ वाजताच्या सुमारास कालीधांग येथील जनरल एरियामध्ये त्यांच्या वाहनावर डोंगरावरून एक मोठा दगड कोसळला. हा दगड थेट सुभेदार बसलेल्या बाजूला आदळल्याने त्यांच्या डोक्याला आणि खांद्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने जवळच्या डोग्रा स्काऊट्सच्या वैद्यकीय कक्षात हलवण्यात आले, मात्र उपचार सुरू असताना दुपारी १:५० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. शहीद सुभेदार नेतराम हेमराज हे गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील सुकाटोला येथील रहिवासी होते. त्यांच्या पश्चात पत्नी कविता आणि कुटुंबिय आहेत. या घटनेची माहिती मिळताच लष्कराच्या वतीने त्यांच्या कुटुंबियांना कळवण्यात आले असून गावात शोककळा पसरली आहे.
शहीद नेतराम हेमराज यांचे पार्थिव सध्या सिमला येथे असून, कायदेशीर प्रक्रियेनंतर ते २१ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास विशेष विमानाने दिल्लीहून नागपूर विमानतळावर आणले जाणार आहे. नागपूर विमानतळावर गार्ड्स रेजिमेंटल सेंटर (GRC) कामठी यांच्या वतीने त्यांना लष्करी मानवंदना दिली जाईल. त्यानंतर त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी सुकाटोला येथे नेण्यात येईल, जिथे संपूर्ण लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.




Comments