top of page

१३ डी.जे. चालक-मालकांवर गुन्हे दाखल, २४.६४ लाखांचा मुद्देमाल जप्त!

Sep 25
2 min read

जनचेतना/ गोंदिया/सचिन बोपचे :- मा. सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या नियमांना हरताळ फासत कर्णकर्कश आवाजात डी.जे. वाजवणाऱ्यांविरुद्ध गोंदिया पोलीस प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. नियम आणि निर्बंध धुडकावून लावणाऱ्या डी.जे. चालक व मालकांवर विशेष मोहीम राबवून पोलिसांनी १३ आरोपींविरोधात एकूण ९ गुन्हे दाखल केले आहेत. या धडक कारवाईत डी.जे. सिस्टीम, साऊंड मिक्सरसह वाहने असा तब्बल २४ लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक श्री. गोरख भामरे यांनी डी.जे. चालक व मालकांची बैठक घेऊन ध्वनी प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या दिशा-निर्देशांची आठवण करून दिली होती. मात्र, काही ठिकाणी या सूचनांकडे दुर्लक्ष करत उच्च डेसिबलच्या आवाजात साऊंड सिस्टीम वाजवली जात असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर गोंदिया शहर, रामनगर, गोंदिया ग्रामीण, रावणवाडी आणि गोरेगाव पोलीस ठाण्यांच्या हद्दीत धाडी टाकून ही कारवाई करण्यात आली.



विविध पोलीस ठाण्यांत झालेली कारवाई

गोंदिया शहर: चावडी चौक (छोटा गोंदिया) येथून डी.जे. मालक नंदकिशोर बुधराम राऊत (३८, रा. शास्त्रीवार्ड) याच्यावर गुन्हा नोंदवून १९,००० रुपये किमतीचे २ बेस, २ टॉप आणि १ जनरेटर जप्त करण्यात आले.


रामनगर ठाणे: विद्यानगर टोली येथे कारवाई करत राकेश गजभिये, अंकित नागोसे व हिरेश घारपिंडे यांच्याकडून १५,००० रुपयांची सिस्टीम जप्त. आंबेडकर चौक (कुडवा) येथून सोहेल सलीम शेख याच्याकडून २ बेस, २ टॉप, १५ भोंगे आणि टाटा कंपनीचे चारचाकी वाहन असा एकूण ३,००,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त. रेल्वे चौकी (कटांगीटोला) जवळ दिनेश देवीलाल भगत (३०, रा. गर्रा) याच्याकडून २ बेस, २ टॉप, साऊंड मिक्सर व वाहनासह २,३०,००० रुपयांचा ऐवज जप्त.


गोंदिया ग्रामीण:ताडाटोली (अदासी) येथे चंद्रप्रकाश भांडारकर व सचिन भांडारकर (रा. दतोरा) यांच्याकडून ४ बेस, ४ टॉप, इको साऊंड सिस्टीम आणि टेम्पोसह २,९०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त. पांढराबोडी येथे तनुज कृष्णा यादव (२६, रा. न्यू लक्ष्मी नगर) याच्याकडून साऊंड सिस्टीम, १० लाईट्स व आयशर वाहनासह ३,५०,००० रुपयांचा ऐवज जप्त.


गोरेगाव ठाणे: पवन तलावाजवळ सार्वजनिक ठिकाणी डी.जे. वाजवणारे राकेश अगळे (रा. गोरेगाव) व तुषार चव्हाण (रा. मुंडीपार) यांच्याकडून ८ बेस, ८ टॉप, मिक्सर, आयशर व झेनान पिकअप वाहनासह तब्बल ८,२०,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.


रावणवाडी ठाणे: दासगाव येथे दुर्गेश भोजराज तूरकर व डी.जे. मालक देवानंद बाबू कटरे (दोघे रा. डोंगरगाव) यांच्याकडून ४ बेस, ४ टॉप, आयशर व झेनान वाहनासह ४,४०,००० रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली.


मागील दोन दिवसांत झालेल्या या धडक कारवाईमुळे डी.जे. चालकांचे धाबे दणाणले आहेत. आगामी सण-उत्सवाच्या काळात गणेश मंडळे, डी.जे. चालक व मालकांनी ध्वनी प्रदूषणाबाबतच्या नियमांचे काटेकोर पालन करावे. अन्यथा याहून अधिक कडक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. ही धडक कारवाई गोंदियाचे पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे (कॅम्प देवरी) व उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशचंद्र शुक्ला यांच्या मार्गदर्शनात गोंदिया शहरचे ठाणेदार प्रवीण बोरकुटे, रामनगरचे ठाणेदार तिरुपती राणे, गोंदिया ग्रामीणचे ठाणेदार वैभव पवार, रावणवाडीचे ठाणेदार रामदास शेवते, गोरेगावच्या ठाणेदार वैशाली ढाले व त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदारांनी यशस्वीरीत्या पार पाडली.




 
 
 

Comments


bottom of page