दारू दुकानाच्या विरोधात महिलांचे आंदोलन
- Mar 23
- 2 min read
जनचेतना/गोंदिया/सचिन बोपच

गोंदिया:आमगाव नगर परिषद हद्दीतील किडंगीपार परिसरात शिवणी मार्गावर नव्याने सुरू करण्यात आलेल्या देशी दारू दुकान व एका बार विरोधात ग्रामस्थांचा रोष वाढत आहे. शनिवारी किडंगीपार येथील ग्रामस्थ महिला-पुरुषांनी दुकानासमोर ‘दारू दुकान बंद करा अशा घोषणा देत भगवान शंकराच्या प्रतिमे समोर यज्ञ करून निषेध नोंदविला. तसेच प्रशासनाला मंगळवार २४ फेब्रुवारी पर्यंत कारवाई करण्यासाठी मदत दिली.
प्रसंगी ग्रामस्थांनी सांगितले की, त्यांनी गोंदिया जिल्हाधिकारी प्रजित नायर (गोंदिया) यांना लेखी निवेदन दिले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी २४ फेब्रुवारी पर्यंत कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते; मात्र, अद्याप कसलीही, कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.‘दारू दुकान बंद करा’ अभियानाचे प्रमुख संतोष दोनोडे, माजी सरपंच घनश्याम मेंढे, सेवंता भांडारकर, ममता पाउलझगडे, भांडारकर, सामाजिक कार्यकर्ते रामदास गायधने, राजेंद्र मेंढे, चुनेश्वरी हरीणखेडे, रमेश गायधने, ईश्वर बहेकार, शुभम भांडारकर, इंद्रकुमार हत्तीमारे आदींसह मोठ्या संख्येने महिला, पुरुष व बालक यांनी गावातील शिव मंदिरासमोर यज्ञ करून एक आगळे वेगळे आंदोलन केले. किडंगीपार गावात मोठ्या प्रमाणावर मजूर वर्ग आहे. हे मजूर दररोज आमगाव येथे कामासाठी जातात. गावात दारू दुकान सुरू झाल्यास मजूर वर्ग अधिक प्रमाणात व्यसनाधीन होईल, कुटुंबांत कलह वाढले, आर्थिक परिस्थिती बिघडेल यामुळे ग्रामस्थ महिला पुरुषांनी ही दारू दुकान बंद करण्याची मागणी केली आहे.
दारू दुकान तत्काळ बंद करण्याची मागणी
ग्रामस्थांनी गोंदिया जिल्हाधिकारी या सह अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग, गोंदिया जिल्हा पोलिस अधीक्षक, आमगाव तहसीलदार , आमगाव पोलीस निरीक्षक तसेच मुख्याधिकारी नगर परिषद आमगाव यांना निवेदन सादर केले आहेत. मात्र अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. दरम्यान, ग्रामस्थांनी दुकान जबरदस्तीने बंद करण्याचा निर्णय सध्या स्थगित ठेवून प्रतीकात्मक ‘दारू दुकान बंद करा’ यज्ञ केला आहे. परंतु प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास या करिता आंदोलन उग्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
शाळेजवळ दारू दुकान; अपघाताचा वाढता धोका
ग्रामस्थांच्या माहितीनुसार नवीन देशी दारू दुकान सुरू मुख्य रस्त्यावर आणि गावाच्या अगदी जवळ असून शेजारीच शाळा आहे. पार्किंगची कोणतीही सोय नसल्याने अपघात होण्याची शक्यता अधिक आहे. शाळेत जाणाऱ्या मुली मोठ्या संख्येने सायकलने ये-जा करतात, या मार्गाने झिंगत येत असलेल्या व्यक्तींमुळे त्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.




Comments