top of page

प्रत्येक रुग्णालयात आता 'पॅलिएटीव्ह केअर' सेवा; जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार यांची माहिती

  • Mar 22
  • 2 min read

जनचेतना/गोंदिया/सचिन बोपच




राज्यात कर्करोग, हृदयरोग, मधुमेह आणि वृद्धत्वाशी संबंधित आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. अशा गंभीर आजारांशी झुंजणाऱ्या रुग्णांना केवळ उपचारांचीच नव्हे, तर मानसिक आधार आणि वेदनामुक्तीची नितांत गरज असते. हीच गरज ओळखून आता जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय रुग्णालयात 'पॅलिएटीव्ह केअर' (पशामक उपचार) सेवा बंधनकारक करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार यांनी दिली.

 

वेदनाग्रस्त रुग्णांसाठी मोठा दिलासा

 

डॉ. गोल्हार यांनी सांगितले की, "अनेकदा रुग्ण वेदना आणि मानसिक तणावात जीवन जगत असतात. 'रुग्ण वाचला पाहिजे' या संकुचित दृष्टिकोनापलीकडे जाऊन, रुग्णाला सन्मानाने आणि वेदनामुक्त जगता आले पाहिजे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे." ही योजना दुर्लक्षित आणि गरजू रुग्णांसाठी शासनाची एक मोठी हमी ठरणार आहे.

 

सर्व स्तरावर उपलब्धता: ही सेवा केवळ जिल्हा रुग्णालयातच नव्हे, तर उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे (PHC) आणि आरोग्यवर्धिनी केंद्रांवरही उपलब्ध असेल. खाटांचे आरक्षण: जिल्हा रुग्णालयांमध्ये या सेवेसाठी किमान ४ ते ६ खाटा राखीव ठेवण्यात येतील. कोणत्याही गरजू रुग्णाला 'बेड नाही' असे म्हणून नाकारता येणार नाही. औषधांची उपलब्धता: सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे, मॉर्फिनसारखी प्रभावी वेदनाशामक औषधे आता थेट प्राथमिक आरोग्य केंद्रांवर उपलब्ध करून दिली जाणार आहेत. ग्रामीण भागातील रुग्णांना आता या औषधांसाठी जिल्हा रुग्णालयात फेऱ्या मारण्याची गरज उरणार नाही.  बहुआयामी उपचार: यात २४ तास नर्सिंग केअर, समुपदेशन, फिजिओथेरपी आणि गरजेनुसार गृहभेटीचाही समावेश असेल.

 

केवळ 'शेवटच्या क्षणाची' सेवा नाही

 

पॅलिएटीव्ह केअरबाबत असलेला संभ्रम दूर करताना डॉ. गोल्हार म्हणाले की, ही सेवा केवळ आयुष्याच्या शेवटच्या क्षणापुरती मर्यादित नाही. आजाराचे निदान झाल्यापासून ते उपचारांच्या संपूर्ण प्रवासात रुग्णाला शारीरिक वेदना नियंत्रण, मानसिक-सामाजिक आधार आणि कौटुंबिक समुपदेशन देणारी ही एक प्रभावी वैद्यकीय व्यवस्था आहे.

प्रशासनाने स्पष्ट संदेश दिला आहे की, "उपचार झाले, पण वेदना आमच्या जबाबदारीबाहेर आहेत," असे आता कोणत्याही रुग्णालयाला सांगता येणार नाही. या सेवेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. अभिजीत गोल्हार यांनी केले आहे.


Comments


bottom of page