Gondia Crime : बँकेच्या कर्जापायी रचला स्वतःच्या मृत्यूचा कट, दारू पाजून शेजारच्या मित्रालाच संपवलं; 8 महिन्यानंतर थरारक घटनेचा उलगडा, गोंदियात खळबळ
- May 16
- 2 min read
जनचेतना/गोंदिया/सचिन बोपचे :- मानवी क्रुरतेची परिसीमा ओलांडणारी आणि कायद्याच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न करणारी एक धक्कादायक घटना गोंदिया जिल्ह्यातून समोर आली आहे. शिस्तबद्ध कट, अत्यंत थंड डोक्याने केलेला खून आणि त्यानंतर स्वतःचा मृत्यू आभासी पद्धतीने प्रस्थापित करण्याचा अघोरी प्रयत्न, चित्रपटाच्या पटकथेसारखं भासावं अशा एका शिस्तबद्ध खूनाच (Gondia Crime News) उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. मृताच्या भावाला संशय आल्याने पोलिसात तक्रार दाखल केल्याने घटनेचे बिंग फुटलं आहे. दरम्यान, अशा या गुंतागुंतीच्या हत्याकांडाचा आमगाव पोलिसांनी पर्दाफाश केला असून देवरी येथील अर्बन बँकेच्या 5 लाखांच्या पोल्ट्री फार्म व्यवसायाच्या कर्जातून आणि कायदेशीर (Crime News) कचाट्यातून सुटण्यासाठी एका 28 वर्षीय तरुणाने आपल्याच गावातील निष्पाप मित्राचा बळी दिल्याचे पुढे आले आहे. परिणामी, तब्बल 8 महिने पोलिसांना गुंगारा देणाऱ्या या जिवंत गुन्हेगाराला अखेर अटक करण्यात आली असून, त्याच्याच वडिलांनी त्याला पोलिस ठाण्यात आणून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
देवरी तालुक्यातील डोंगरगाव येथील रहिवासी असलेला आरोपी अंतिम ओमप्रकाश खोटेले (28) याने पोल्ट्री फार्मच्या व्यवसायासाठी देवरी येथील अर्बन बँकेकडून 5 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, व्यवसायात यश न आल्याने तो प्रचंड तणावात होता. या कर्जातून कायमची सुटका करून घेण्यासाठी त्याने स्वतःलाच 'मृत' घोषित करण्याचा एक भयानक कट रचला. या विळख्यातून सुटण्यासाठी त्याने आपल्याच गावातील मित्र चंद्रकुमार सराटे (46) यांचा खून करण्याचा बेत आखला. 28 ऑगस्ट 2025 रोजी मध्यरात्री आरोपी अंतिम खोटेले हा चंद्रकुमार सराटे यांच्या घरी गेला. 'काहीतरी काम आहे', असे सांगून त्याने चंद्रकुमार यांना विश्वासाने आपल्या दुचाकीवर बसवले. तिथून तो त्यांना बाह्मणी येथील रेल्वे पटरीच्या दिशेने घेऊन गेला. तिथे चंद्रकुमार यांना जबरदस्तीने दारू पाजली.
दरम्यान, मद्याच्या प्रभावामुळे चंद्रकुमार जेव्हा पूर्णपणे असहाय्य झाले, तेव्हा 29 ऑगस्ट 2025 च्या पहाटे आरोपी अंतिम खोटेले याने स्वतःच्या दुपट्याने चंद्रकुमार यांचा गळा आवळला. काही क्षण चाललेल्या तडफडाटानंतर चंद्रकुमार सराटे यांची प्राणज्योत मालवली. हत्या केल्यानंतर आरोपीने पोलिसांची आणि बँकेची दिशाभूल करण्यासाठी एक थक्क करणारा देखावा उभा केला. त्याने मृत चंद्रकुमार यांच्या शरीरावरील कपडे बदलून त्यांना स्वतःचे कपडे घातले. रेल्वे दुर्घटनेत मरण पावलेली व्यक्ती ही चंद्रकुमार नसून स्वतः 'अंतिम खोटेले' आहे, असे सर्वांना वाटावे म्हणून त्याने मृतदेहाच्या खिशात स्वतःचे ओळख पटवणारी कागदपत्रे (आधारकार्ड) आणि एटीएम कार्ड मुद्दाम ठेवून दिले.
आपली दुचाकीही त्याने त्याच घटनास्थळावर, म्हणजे बाह्मणी रेल्वे (आमगाव-देवरी महामार्ग) पटरीपासून तीन किलोमीटर पूर्व दिशेला सोडून दिली आणि तो स्वतः रात्रीच्या अंधारात फरार झाला. या हुशारीमुळे आठ महिन्यांपर्यंत तो जगाच्या नजरेत 'मृत' होता आणि बँकेचे 5 लाखांचे कर्जही त्याच्या मृत्यूसोबत संपले, असे दाखवण्याचा त्याचा प्रयत्न होता. चंद्रकुमार सराटे यांचे भाऊ रमेश सराटे (वय 43, रा. डोंगरगाव) यांच्या मनात या घटनेबाबत आणि चंद्रकुमार यांच्या बेपत्ता असण्याबाबत तीव्र संशय निर्माण झाला होता. अखेर त्यांनी आमगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. आमगाव पोलिसांनी तांत्रिक तपास करत ज्याला जग मृत मानत होते, तो अंतिम खोटेले प्रत्यक्षात जिवंत आहे, हे सिद्ध केले.




Comments