लग्नासाठी दबाव टाकत अल्पवयीन मुलीचे अपहरण; शाळेत बांधून ठेवण्याचा संतापजनक प्रकार
- Apr 23
- 1 min read
तिरोडा/ गोंदिया : तिरोडा तालुक्यातील दवनीवाडा पोलीस ठाणे हद्दीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला शाळेच्या खोलीत हात-पाय बांधून ठेवण्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगी आणि आरोपी सुमित ऊईके (वय 21) हे एकाच गावातील असून त्यांच्यात पूर्वीपासून ओळख होती. काही महिन्यांपासून आरोपीकडून मुलीवर दबाव टाकला जात असल्याची माहिती समोर येत आहे. याआधीही तिच्या इच्छेविरुद्ध गैरवर्तन केल्याचा आरोप आहे.

घटनेच्या दिवशी आरोपीने मुलीला धमकावून जबरदस्तीने दुचाकीवर बसवले आणि तिला गावातील जिल्हा परिषद शाळेत नेले. तेथे लग्नासाठी जबरदस्ती करत नकार दिल्यानंतर तिचे तोंड, हात आणि पाय बांधून एका खोलीत बंद करून ठेवले. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. दुसऱ्या दिवशी शाळा उघडताना हा प्रकार उघडकीस आला. कर्मचाऱ्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले. या घटनेने तिरोडा तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. दवनीवाडा पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यासह भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवला असून शोधमोहीम राबवून त्याला रात्री उशिरा अटक करण्यात आली. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.




Comments